📙 ओळख सण -उत्सवांची 📗
👥 मकर संक्रांती 👥
आपला देश साऱ्या जगात प्रामुख्याने उत्सव प्रिय देश म्हणून ओळखला जातो.असा एकही महिना नाही की त्यात एखादा हिंदू सण येत नाही. हिंदू धर्मात विविध सण, उत्सव यांना फार मोठे धार्मिक महत्व असते आणि प्रत्येक हिंदू तो मोठ्या आत्मीयतेने व उत्सवाने साजरा करतो,अशाच अनेक प्रमुख सणांपैकी मकर संक्रांत हा देखील एक महत्वाचा सण आहे.
मकरसंक्रांत हा सण दरवर्षी साधारणतः जानेवारी महिन्याच्या 14 तारखेस येतो.पण ज्या वर्षी लीप वर्ष असते, त्या वर्षी मात्र अपवादाने जानेवारीच्या 15 तारखेस हा सण साजरा करतात. हिंदू परंपरेनुसार या दिवशी सूर्य त्याचे दक्षिणायन संपवून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याचे उत्तरायण सुरू होते.भारत हा भौगोलिक दृष्ट्या उत्तर गोलार्धात येतो आणि मकरवृत्त हे दक्षिण गोलार्धात येते,त्यामुळे या काळात सूर्य किरणे भारतीय उपखंडात तिरपी पडतात व त्यामुळे भारतात या काळात कडाक्याच्या थंडीचा अनुभव येतो.उत्तर भारतात तर काही ठिकाणी हिमवर्षाव देखील होतो.म्हणून मानवी शरीराला थंडी पासून बचाव व्हावा यासाठी गूळ व तीळ यांचे सेवन करून आपले आरोग्य टिकवणे गरजेचे असते.म्हणूनच आपण सर्व जण तीळ गूळ वाटून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो.
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावाने साजरा करतात. तामिळनाडूत याला पोंगल म्हणतात,तर गुजरातमध्ये उतारायन म्हणून जाणतात.भारताव्यतिरिक्त श्रीलंका, नेपाळ, म्यानमार,बंगलादेश येथे देखील मोठ्या उत्साहात मकर संक्रांती साजरी करतात. हा सण काही ठिकाणी 3 दिवस तर काही ठिकाणी 4 दिवस साजरा करतात. संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी तर संक्रांतीनंतरचा दिवस कर म्हणून साजरा करतात. संक्रांतीच्या दिवशी घरात गोडधोड अन्न बनवतात. एकमेकांना "तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला" म्हणून शुभेच्छा देतात.आपपसातले पूर्वीचे वैर विसरून मैत्री व एकोप्याचा संदेश देतात.वर्षभरातील सर्व रुसवे फुगवे विसरून नात्यात गोडवा आणणारा सण म्हणजे मकर संक्रांत होय.
गुजरात राज्यात या दिवशी पतंग उडवतात. तेथे मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याच्या स्पर्धा भरविण्यात येतात. हा सण 'पतंगमहोत्सव' म्हणून साजरा करतात.उत्तर भारतात या दिवशी पवित्र नदीत स्नान करून वर्षभरात केलेल्या वाईट कामापासून मुक्ती मिळवतात.
असा हा विविधतेत एकता असणारा अस्सल भारतीय सण आहे.
चला तर मग तुम्हांसही "तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला", "आमचं तीळ गूळ सांडू नका,आमच्याशी भांडू नका".संक्रांती च्या खूप खूप शुभेच्छा.
No comments:
Post a Comment